मुंबई : जेजे हॉस्पिटलमध्ये एका रूग्णाला डॉक्टरांनी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. सलीम शेख या बांधकाम मजुराच्या शरीरात पोटात घुसलेल्या सळ्या थेट खांद्यातून बाहेर आल्या होत्या. ५ तास ऑपरेशन करून या सळ्या बाहेर काढण्यात आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रूग्ण सलीम शेखची अवस्था पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल. ८ मार्चला लासलगावात बांधकाम सुरू असताना तो पहिल्या मजल्यावरून खाली कोसळला. त्यामुळे एक सळी थेट त्याच्या पोटात घुसून खांद्यातून बाहेर आली. ४ फूट लांबीची आणि ८ मिलीमीटर जाडीची ही सळी सलीमच्या शरिरात घुसून होती. 


सलीमच्या आतडे, यकृत, फुफ्फूस आणि मानेला अक्षरशः सळीने चिरलं होतं. सलीमला तातडीने मुंबईत जेजे रूग्णालयात हलवण्यात आलं. तब्बल २० तास ही सळी सलीमच्या शरीरात होती. या दरम्यान सलीम बेशुद्ध होत. अखेर डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत ५ तासांच्या ऑपरेशननंतर सलीमच्या शरीरातून ही सळी बाहेर काढली. 


सलीमच्या शरीरातून ही सळी बाहेर काढण्यासाठी ५ डॉक्टरांच्या टीमने प्रयत्नांची शर्थ केली. डॉक्टरांसाठीही हे एक आव्हानच होतं. मानसिक शांतता ठेऊन डॉक्टरांनी हे अतिशय कठीण ऑपरेशन यशस्वी करून एक चमत्कार करून दाखवलाय. 
 
सलीमचे प्राण वाचण्याची शक्यता खूपच कमी होती. तरीही डॉक्टरांनी सलीमला वाचवण्याचा निर्णय घेतला. याआधी जगात अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये केवळ चीन आणि जपानमध्ये यश आलंय. आता भारतातही जेजे रूग्णालयाच्या डॉक्टरांनी हे आव्हान पेलून दाखवलं.