मुंबई : राज्यभरात कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतंय. त्यातच दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढतेय. अशातच आता कोरोनावर उपचार देणाऱ्या डॉक्टरांनाही संसर्ग होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. मुंबईतील सरकारी रूग्णालयातील निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील सर जे.जे रूग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोलुंके यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जे.जे रूग्णालयातील 62 निवासी डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली आहे.


कोरोना संसर्गाच्या या लाटेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची संख्या वाढली आहे. कोरोना बाधित डॉक्टरांमध्ये जेजे रुग्णालयातील 62, लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये 50, केईएममध्ये 40 आणि नायर रुग्णालयामधील 40 निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संसर्गक्षमता अधिक असल्यामुळे डॉक्टरांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


कोरोना संसर्गाच्या या लाटेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची संख्या मागील दोन लाटांच्या तुलनेमध्ये वाढत असल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती निवासी डॉक्टरांच्या संघटनेने दिली आहे.