5 बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 90 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा, मुख्य सूत्रधारला अटक
GST scam : आता एक बातमी घोटाळ्याची. कर चुकवेगिरी करत सरकारची फसवणूक करणाऱ्याला जेलची हवा खावी लागली आहे. खोटी बिले देऊन शासनाचे करोडो रुपये बुडविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : GST scam : आता एक बातमी घोटाळ्याची. कर चुकवेगिरी करत सरकारची फसवणूक करणाऱ्याला जेलची हवा खावी लागली आहे. खोटी बिले देऊन शासनाचे करोडो रुपये बुडविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. त्याने 90 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला. या कर चुकवेगिरी प्रकरणात या आर्थिक वर्षातील सलग दहावी अटक आहे. या कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.
शासनाचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरोधात सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करुन सुमारे 90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैदय यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे.
शशांक वैदय यांनी मे.एस.एस. सर्व्हिसेससह अन्य पाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 88 कोटी रुपयांची खोटी बीजके जारी केली आहेत. त्यानुसार शासनाची सुमारे 16 कोटींची महसुली हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना शशांक वैदय हे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणामध्ये वस्तू आणि सेवांचा पूरवठा न करता महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे. त्यामुळे शशांक वैदय यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी बुधवारी अटक केली आहे. त्यांचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असल्याने वस्तू व सेवाकर कायदा 2017 नुसार जेलची हवा खावी लागत आहे. या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशिवाय 17 कोटी रुपयांची बनावट बीजके देऊन, 3.09 कोटी रूपयांचा वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करुन 3.09 कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. तसेच करदाता मे.एस.एस. सर्व्हिसेसच्या मालक सायली परुळेकर या कोणताही व्यवसाय करीत नाहीत, असे तपासात लक्षात आले आहे.