मुंबई : मुंबईतील डोंगरी परिसरात असणारी १०० वर्षे जुनी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. म्हाडाची ही इमारत पडल्यामुळे संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्याच्या घडीला या परिसरात बचावकार्य अतिशय वेगाने सुरु आहे. यातच एका लहान बाळाला इमारतीच्या ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला अवघ्या तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. चिंचोळ्या वाटा आणि गर्दी यांमुळे बचाव कार्यात आणि रुग्णवाहिका नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. 


सोशल मीडियावर बचाव कार्यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एका बाळाला बचाव दलाकडून बाहेर काढण्यात येत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 'एएनाय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या बाळाची प्रकृती स्थिर असून, ते रुग्णालयात सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. संकटाच्या या प्रसंगात बाळाचा जीव वाचल्यामुळे काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पण, तरीही काळाचा हा आघात अनेक कुटुंबांना दु:ख देऊन गेला असं म्हणत सर्वांनीच डोंगरीतील दुर्घटनाग्रस्तांसाठी प्रार्थना केल्या आहेत. 



 


म्हाडाच्या अतिधोकादायक इमारचींच्या यादीत संबंधित इमारतीच्या नावाचा समावेश नव्हता. पण, इमारत जुनी झाल्यामुळे ती विकासकाकडे पुनर्विकासासाठी सोपवण्यात आली होती. असं असलं तरीही अद्यापही विकासकाकडून त्यादृष्टीने कोणतीच पावलं उचलली गोली नाहीत. परिणामी या हलगर्जीपणामुळे आणि मानवनिर्मित आपत्तीमुळेच हे संकट ओढवलं गेल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. शिवाय प्रशासनाच्या माथी या साऱ्याचं खापर फोडण्यासही सुरुवात झाली आहे.