Mumbai Crime News : नोकरी करणाऱ्या उच्च शिक्षीत तरुणांचे वर्षाचे पॅकेजही 5 कोटी नसते. पण, फक्त बारावी पास असलेला एक तरुण दिवसाला 5 कोटींची कमाई करत होता. मुंबई पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. दिवसाला पाच कोटींची कमाई करणारा हा तरुण जे काम करायचा ते पाहून पोलिसही शॉक झाले आहेत. विशेष म्हणजे चिनी नागरीकांच्या मदतीने चो हे काम करत होता. या तरुणाच्या अटकेमुळे साईबर क्राईमचे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनिवास राव दादी (वय 49 वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. श्रीनिवास हा मुळचा हैदराबादचा रहिवासी आहे. मुंबईतील बांगूर नगर पोलिसांनी सायबर गुन्ह्याखाली त्याला अटक केली आहे. त्याने संपूर्ण देशभरात अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. बांगूर नगर पोलिसांच्या पथकाने श्रीनिवासला हैदराबादमधील एका आलिशान हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. 


श्रीनिवाससह, पोलिसांनी त्याच्या टोळीतील आणखी चार सदस्यांना अटक केली आहे. दोघे जण ठाणे इतर दोघे कोलकाता येथील आहेत. पोलिसांनी श्रीनिवासची 40 बँक खाती गोठवली आहेत. तसेच त्याच्याकडून 1.5 कोटी रुपये देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. 


श्रीनिवासच्या तेलंगणातील सायबराबाद येथील घरातून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. तपासादरम्यान हजारो महिलांची छायाचित्रे, त्यांचे ईमेल आयडी, त्यांच्याशी चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स आणि लांबलचक संभाषणांचा तपशील  पोलिसांच्या हाती लागला आहे.


असा कमावायचा कोट्यावधी रुपये


श्रीनिवास आणि त्याचे साथीदार लोकांना फोन करायचे. विशेषत: ते महिलांना टार्गेट करायचे. पोलिस असल्याचे भासवून ते लोकांना गंडा घालायचे. तुमच्या नावाने पाठवलेल्या कुरिअरमध्ये अधिकाऱ्यांना शस्त्रे किंवा ड्रग्स मिळाल्या आहेत. असे सांगून ते लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचे. यानंतर सेटेलमेंटसाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचे. यानंतर त्यांचे बँक डिटेल्स घेवून त्यांना गंडा घालायचे.  पोलिस असल्याचे भासवून त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची देखील आर्थिक फसवणूक केली होती. 


पैसे वळवण्यासाठी चिनी नागरिकाची मदत


श्रीनिवासच्या खात्यातून दररोज 5 ते 10 कोटी रुपयांचे व्यवहार होत होते. यामुळे  श्रीनिवास फसवणूक केलेली रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये बदलून ती एका चिनी नागरिकाकडे हस्तांतरित करत असे. मुंबईतच नव्हे, तर कोलकाता, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतही या टोळीचे नेटवर्क असल्याची माहितीपोलिस तपासात समोर आली आहे.