मुंबई : मुंबईतल्या कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वत्सला ताई नाईक नगरातील एका महिलेवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. त्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झालं होतं. ही महिला भाजी आणायला गेली असताना शिवाजी कांबळे या इसमानं त्या महिलेच्या मानेवर आणि पोटात वार केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेनंतर हल्लेखोर शिवाजी कांबळे पळून गेला. जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी शिवाजी कांबळेला दादरमधून अटक करण्यात आली. १३ वर्षांपूर्वी या महिलेच्या मुलीवर शिवाजी कांबळेच्या मुलानं बलात्कार केला होता. तो अजूनही जेलमध्ये असल्याचा राग मनात धरून त्यानं हल्ला केला असल्याचं त्यानं काबुल केलंय.


दरम्यान, मुंबईतील महिला सुरक्षित नसल्याचे विविध घटनांमधून पुढे येत आहे. विक्रोळी येथे एका तरूणाने महिलेच्या ऑफिसमध्ये घुसून तिच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली. या प्रकरणात तरूणाने महिलेच्या चेहऱ्यावर आणि हातावर वार केले. तिच्यावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरु होते. या प्रकरणी आरोपी साविर हसन मोहम्मद बिन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून आरोपी तरूण तिलाब्लॅकमेल करत होता.


दरम्यान, अशीच एक दुसरी घटनाही घडली आहे. नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणाला कुर्ला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. या तरूणावर मारहाण आणि पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इम्रान शेख असं या आरोपीचं नाव आहे. १७ ऑक्टोबरला इम्राननं पीडित तरुणीची छेड काढत धारधार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. या मारहाणीत तीच्या नाकाचं हाड तुटल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.