हनी ट्रॅप प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलला अटक; बिकिनी घालून आत बोलवायची आणि नंतर...
हनी ट्रॅपिंग प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलला अटक केली आहे. ही टोळी पीडितांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होती.
हनी ट्रॅपिंग प्रकरणी मुंबईतील एका मॉडेलला अटक करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ही टोळी पीडितांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होती. ही घटना बंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नेहा उर्फ मेहेर असं अटक केलेल्या या मॉडेलचं नाव आहे. प्राथमिक तपासात नेहाच मुख्य आरोपी असल्याचं समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा उर्फ मेहेर टेलिग्रामच्या माध्यमातून बंगळुरुतील 20 ते 50 वर्षं वयोगटातील व्यक्तींच्या संपर्कात होती. हे सर्वजण जास्त हुशार नसतील याची काळजी तिने घेतली होती. नेहाने या सर्वांना जे पी नगरमधील आपल्या घरी शारिरीक संबंध ठेवण्याचं आमिष दाखवलं होतं. ते घरी पोहोचताच ती बिकिनी घालून त्यांना घरात बोलवत असे.
यावेळी तिची टोळी खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद करत असे. नंतर ते घरात घुसून पीडित तरुण आणि तिचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ काढत असत. यानंतर टोळीतील सदस्य पीडित व्यक्तीचा मोबाईल खेचून घेत असत आणि त्यातील सर्व फोन क्रमांक लिहून घ्यायचे. पीडित व्यक्तींकडे पैशांची मागणी केली जायची. जर तू आम्हाला पैसे दिले नाही तर खासगी व्हिडीओ आणि फोटो सर्व फोन क्रमांकांवर पाठवू अशी धमकी ते देत असत.
ही टोळी पीडित व्यक्तीला तू मॉडेलशी लग्न कर यासाठी दबाव टाकत असत. तसंच ती मुस्लीम असल्याने तुला लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारत धर्मातर करावं लागेल असं सांगायचे. याशिवाय त्याने तात्काळ खतना करावा यासाठीही आग्रह करायचे. या सर्व मागण्या ऐकून पीडित व्यक्ती घाबरत असे आणि आपली सुटका करण्याच्या हेतूने पैसे देण्यास तयार व्हायचा.
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या एका पीडित व्यक्तीने हिंमत एकटवत पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार केली. यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासात या टोळीत एकूण 12 सदस्य होते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान ही टोळी इतरही गुन्ह्यांमध्ये सहभागी असावी अशी पोलिसांना शंका असून त्यादृष्टीनेही तपास सुरु आहे.
याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी शरणा प्रकाश बालिगेरा, अब्दुल खादर आणि यासीन यांना अटक केली होती. पोलिसांनी आणखी एका आरोपी नदीमचा शोध सुरू केला आहे.