आईच मुलाला ड्रग्स देऊन म्हणायची `जा चोऱ्या करून ये!` कित्येकदा अटक झाली, सुटताच...
मुबंई पोलिसांनी (Mumbai Police) एका अट्टल चोराला अटक केली आहे. 24 वर्षीय कृष्ण रवी महेसकर याच्याविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे.
मुंबई पोलिसांनी एका अट्टल चोराला अटक केली आहे. त्याने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्या आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता काही धक्कादायक बाबी उघड झाल्या. चोरी करण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्याची आईच त्याला ड्रग्जचं सेवन करायला लावत असे असं पोलीस तपासात उघड झालं आहे. यानंतर पोलीसही चक्रावले आहेत.
चोराची ओळख पटली असून कृष्ण रवी महेसकर असं त्याचं नाव आहे. 24 वर्षीय रवीविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण 22 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काळाचौकी पोलिसांनी आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे.
काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, "24 वर्षीय रवी महेसकर हा नियमत गुन्हेगार आहे. त्याच्या सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याची आई विजेता महेसकर (50) हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. घरफोडीसाठी बाहेर पाठवण्यापूर्वी ती त्याला ड्रग्ज देत असे. तसंच चोरीच्या मालमत्तेची विल्हेवाट लावत असे”. पोलिसांनी अद्याप आरोपीच्या आईला अटक केलेली नाही. ती सध्या फरार आहे.
आई आणि मुलगा मध्य मुंबईतील काळाचौकी परिसरातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही फौजदारी खटल्यातून जामिनावर सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी घरफोडी करत असे. या नव्या प्रकरणात, महेसकरला आग्रीपाडा परिसरातून अटक करण्यात आली होती, पोलिसांनी अधिक तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.