मुंबई : मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलंय. गेल्या काही महिन्यात मंत्रालयात झालेला आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर शेतकरी-पोलीस यांच्यामध्ये झालेली धक्काबुक्की यामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाची जवाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गृह विभागाच्या सुचनेनुसार काही पावले उचललीत. यानुसार मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला आधार कार्ड सक्तीचे केले जाणार आहे.


मंत्रालय प्रवेशासाठी मिळणा-या पासवर कोणत्या मजल्यावर जायचे ते स्पष्ट लिहण्यात येणार आहे. यामुळे संबंधित मजल्यावरील सुरक्षा रक्षक - पोलिसांना लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.


मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींसाठी आकाशवाणी गेट जवळ व्हिजीटर्स रूम केली जाणार आहे. मंत्री - आमदार यांच्या गाडीतून प्रवेश करणा-या सर्वसामान्य व्यक्तीलाही आधार कार्ड दाखवणे सक्तीचे असेल. मंत्रालयात प्रवेश करणा-या गाडीची कसून तपासणी केली जाणार आहे. तसंच मंत्रालयची संरक्षक भिंत 8 फूट उंचीची केली जाणार आहे. या भिंतीवर संरक्षक जाळी बसवली जाणार आहे.