मुंबई: २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार नव्हते. त्यांच्या मनात चलबिचल सुरु होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी त्यांना हे आव्हान स्वीकारण्याची गळ घातली, अशी माहिती आता समोर आली आहे. सुधीर सूर्यवंशी लिखित 'चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र' (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra) हे पुस्तक सध्या चांगलेच गाजत आहे. या पुस्तकात २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर पडद्यामागे घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींचा उल्लेख आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुस्तकात ११ नोव्हेंबरला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईच्या ताज लँडस अँण्ड हॉटेलमध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख आहे. शिवसेना भाजपची साथ सोडेल, याची खात्री पटल्यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ताजमधील या बैठकीला आदित्य ठाकरे, अजित पवार, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील हे नेतेदेखील उपस्थित होते. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र, यानंतरही मुख्यमंत्री कोण असेल, याविषयी शरद पवारांच्या मनात शंका होती. 


शरद पवार आणि राऊतांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर रचला होता भाजपला धक्का द्यायचा प्लॅन


बैठक संपल्यानंतर लिफ्टमधून खाली जात असताना पवारांनी ही गोष्ट संजय राऊत यांच्या कानावर घातली. आपण सरकार तर स्थापन करू, पण मुख्यमंत्री कोण असेल, असा प्रश्न पवारांनी राऊतांना विचारला. त्यावेळी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होती. मात्र, पवारांना हे पर्याय मान्य नव्हते. आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी फारच लहान आहेत. अजित पवार आणि इतर ज्येष्ठ नेते त्यांच्या हाताखाली काम करायला राजी होणार नाहीत. सुभाष देसाई हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चक्क झोपतात. तर एकनाथ शिंदे यांनादेखील मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले जाणार नाही, असे पवारांचे मत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, या मतावर पवार ठाम होते. 


'दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी 'मिरची हवन' केलं होतं'

हे ऐकल्यानंतर संजय राऊत तातडीने पुन्हा बैठकीच्या खोलीत गेले. त्याठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बसले होते. शरद पवार युतीसाठी तयार आहेत. पण, त्यांना मुख्यमंत्रिपदाची चिंता आहे. सध्या शिवसेनेकडून चर्चेत असलेली नावे त्यांना मान्य नाहीत. त्यामुळे तुम्हीच मुख्यमंत्री व्हावे, असे पवारांचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले.


तेव्हा उद्धव ठाकरे काहीसे बैचेन झाले. मी कधीही सरकारमध्ये काम केलेले नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री होण्यास नापसंती दर्शवली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, शिवसेनाचा मुख्यमंत्री व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर ही जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे. अन्यथा काँग्रेस , राष्ट्रवादी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी तयार होणार नाहीत, असे राऊत यांनी म्हटले. त्यावेळी बाजूलाच उभे असलेल्या आदित्य ठाकरे यांनी संभाषणात सहभाग घेतला. त्यांनी म्हटले की, बाबा, तुम्हाला हे आव्हान स्वीकारायलाच पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले पाहिजे. शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी तुम्हाला हे करायलाच पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे.