शरद पवार आणि राऊतांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर रचला होता भाजपला धक्का द्यायचा प्लॅन

निकालाच्या दिवशी पत्रकारपरिषद घेऊन शरद पवार त्यांच्या पत्नीसह पुण्याच्या दिशेने रवाना झाले. 

Updated: May 24, 2020, 04:23 PM IST
शरद पवार आणि राऊतांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर रचला होता भाजपला धक्का द्यायचा प्लॅन title=

मुंबई: २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर आधारित 'चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र' (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra) हे पुस्तक सध्या चांगलेच गाजत आहे. सुधीर सूर्यवंशी लिखित या पुस्तकात त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या अनेक गोष्टींविषयी गौप्यस्फोट केले आहेत.
 
या पुस्तकातील आणखी एक किस्सा पुढे आला आहे. यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या गुप्त भेटीत भाजपला धक्का द्यायचा प्लॅन कसा आखला, याचा खुलासा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यादिवशी शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर बसणार, असे स्पष्टपणे सांगितले. या पत्रकारपरिषदेनंतर शरद पवार त्यांच्या पत्नीसह पुण्याच्या दिशेने रवाना झाले. 

'दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी 'मिरची हवन' केलं होतं'

मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ने जात असताना पनवेलजवळच्या McDonald’s आऊटलेटजवळ पवारांनी आपली गाडी थांबवली. त्याठिकाणी संजय राऊत पवारांची वाट पाहत थांबले होते. यानंतर संजय राऊत पवारांच्या गाडीत बसले. यानंतर पवारांची गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. राऊतांची गाडीही त्यांच्या पाठी येत होती. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात तळेगाव टोलनाक्यापर्यंत पोहोचेपर्यंत सुमारे तासभर चर्चा सुरु होती. यावेळी राऊत यांनी आपण एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवू, असा प्रस्ताव पवारांसमोर मांडला. जेणेकरून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. राऊतांच्या या प्रस्तावानंतर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याचे कबूल केले. मात्र, तुम्हीही राज्यातील काँग्रेस नेत्यांशी बोलायला सुरुवात करा, अशी सूचना पवारांनी राऊत यांना केली. 

यानंतर तळेगाव टोलनाक्याजवळ संजय राऊत पवारांच्या गाडीतून उतरले आणि पुन्हा आपल्या गाडीने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर संजय राऊत तातडीने उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी पवारांशी झालेली बोलणी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकारपरिषद पार पडली. निकालानंतरच्या या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहून भाजपही अवाक झाली होती. 
यादरम्यान मुंबई आणि पुण्यातील एका पत्रकारालाही संजय राऊत आणि शरद पवारांच्या या भेटीची कल्पना नव्हती. दोन्ही ठिकाणी पत्रकार नेत्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले होते. मात्र, शरद पवार आणि राऊतांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरच कोणालाही पत्ता लागू न देता बोलणी आटोपल्याचा सुगावा कोणालाच लागला नाही.