मुंबई  : मुंबईतील असिस्टंट लोको पायलट यांचे शिष्टमंडळ आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे वाहतूक सेनेच्या नेत्यांसह शिष्टमंडळ राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट ३०० जागांसाठी भरती घेण्यात आली होती.  त्यापैकी १५० नवनियुक्त कर्मचाऱ्यांना रेल्वेने सेवेत रुजू केले आहे. या भरती प्रक्रियेत अडचणी येत होत्या परंतू या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी मनसेच्या रेल्वे संघटनेने प्रयत्न केला. 



रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेतलेल्या भरतीत १५० उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे. या १५० नवनियुक्त असिस्टंट लोको पायलट कर्मचाऱ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आणि आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष  जितेंद्र पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 


रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेत हलगर्जी करत असून अद्याप आणखी १५० पदांची भरती शिल्लक आहे. या पदासाठीची वेटिंग लिस्ट लवकर न भरल्यास तीव्र आंदोलन करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने दिला आहे.