Coronavirus : पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बरची एसी लोकल सेवा बंद
ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल उद्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : कोरोना व्हायरस टाळण्यासाठी (COVID-19) अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काय करता येईल, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेकडून वातानुकूलित रेल्वेसेवा (AC local) ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. आता मध्य रेल्वेवरही वातानुकूलित रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल उद्या २० ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून रेल्वेकडून काळजी
कोरोनाचा पार्श्वभूमीवर ट्रान्स हार्बर मार्गावरील धावणारी वातानुकूलित लोकल २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्याआधी पश्चिम रेल्वे वरील ही वातानुकूलित लोकलही उद्यापासून रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. मुंबईतही याचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बस आणि रेल्वेमधील नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मुंबईत लोकलला सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे लोकलच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पश्चिम रेल्वेमार्गावर काल आणि आज होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आलेले काही जण प्रवास करताना आढळून आले होते. आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या सहा प्रवाशांना आज ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेसने बडोद्याला जात होते.