`बंदुकीला हात लावला तर गोळी घालेन`; जयपूर एक्स्प्रेसमध्ये चेतनसिंहने महिलेला दिली होती धमकी
Jaipur Mumbai Express Firing : जयपूर मुंबई एक्स्प्रेस प्रकरणातील आरोपी चेतनसिंहबाबत आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे. चेतनसिंहने चौघांची हत्या करण्यासोबत एका बुरखा घातलेल्या महिलेला देखील धमकावल्याचे समोर आले होते. ट्रेनच्यी सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता.
Mumbai Crime : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार (jaipur mumbai express firing) प्रकरणातील आरोपी आरपीएफ हवाल चेतनसिंह (chetan singh) याच्याबाबत रोज नवे खुलासे होत आहे. आरोपीच्या नियमित वैद्यकीय तपासणीत त्याला कोणताही गंभीर मानसिक आजार नसल्याचे समोर आले आहे. जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलै रोजी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा कॉन्स्टेबल चेतनसिंह बच्चुसिंह चौधरी (33) याने चार जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. चेतनसिंहने बुरखा घातलेल्या एका महिला प्रवाशालाही धमकावल्याचा त्याने आरोप करण्यात येत आहे. तसेच चेतनसिंहने महिलेला बंदुकीच्या जोरावर त्याला जय माता दी (Jai Mata Di) म्हणण्यास सुद्धा भाग पाडले.
सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) या प्रकरणाचा तपास करत महिलेची ओळख पटवली असून तिचा जबाब देखील नोंदवला आहे. या प्रकरणात पीडित महिलेलाही मुख्य साक्षीदार करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चेतनसिंह बच्चुसिंह चौधरी याने एका मुस्लीम महिलेलाही रायफलचा धाक दाखवून जय माता दी म्हणण्यास भाग पाडले होते. जयपूर एक्स्प्रेसच्या बी 3 डब्यात हा सगळा प्रकार घडला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी या महिला प्रवाशाची ओळख पटवून तिचा जबाब नोंदवला आहे.
कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याने आपला वरिष्ठ सहाय्यक टिकाराम मीणा व्यतिरिक्त अब्दुल कादर मोहम्मद हुसैन भानपुरवाला, सय्यद सैफुद्दीन आणि असगर अब्बास शेख या तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली होती. सध्या आरोपी चेतनसिंह हा न्यायालयीन कोठडीत आहे. चार जणांच्या हत्येचा आरोपी चेतनसिंह हा मानसिक आजारी असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या चौकशी आणि तपासणीमध्ये आरोपी चेतनसिंहला कोणताही आजार नसल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी चेतनसिंहने जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलै रोजी रायफलचा धाक दाखवून बुरखा घातलेल्या महिलेला थांबवले आणि जय माता दी म्हणण्यास सांगितले. त्यानंतर घाबरलेली महिला जय माता दी म्हणाली. पण त्यावर चेतनसिंहचे समाधान झाले नाही आणि त्याने पुन्हा तिला मोठ्या आवाजात जय माता दी म्हणण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने त्याची रायफल बाजूला करून तू कोण आहेस? असे विचारले. रायफल बाजूला केल्यामुळे चेतनसिंह संतापला व त्याने रायफलला पुन्हा हात लावल्यास गोळ्या घालेन, अशी धमकी दिल्याची माहिती महिलेने जबाबात नोंदवली आहे.