मुंबई: मुंबईवरील २६\११ दहशतवादी हल्ल्याच्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपल्या मुलाला चित्रपटात भूमिका कशी मिळेल, याची अधिक चिंता होती, असे वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना अभिनेता रितेश देशमुखने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. रितेशने सोमवारी ट्विट करून पीयूष गोयल यांचे सर्व आरोप खोडून काढले. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा हक्क जरूर आहे. पण, जगात नसलेल्या व्यक्तीवर आरोप करणे चुकीचे असल्याचे रितेश याने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीयूष गोयल पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या सभेत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना लक्ष्य केले होते. पीयूष गोयल यांनी म्हटले होते की, २६\११ हल्ल्याच्यावेळी दुबळे काँग्रेस सरकार काहीच करू शकले नाही. त्यावेळी ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्याठिकाणी एका चित्रपट दिग्दर्शकाला घेऊन गेले होते. त्यांना हल्ल्यापेक्षा आपल्या मुलाला चित्रपटात भूमिका कशी मिळेल, याची चिंता अधिक असल्याची टीका गोयल यांनी केली होती.



मात्र, रितेशने ट्विटच्या माध्यमातून हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. २६\११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मी ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो होतो. मात्र, गोळीबार सुरु असताना आम्ही त्याठिकाणी होतो, हे खोटे आहे. तसेच माझ्या वडिलांनी मला चित्रपटात भूमिका मिळवून देण्यासाठी हे सर्व केल्याचाही आरोप खोटा आहे. मला चित्रपटात रोल मिळावा म्हणून त्यांनी कधीही कोणत्याही दिग्दर्शकाला गळ घातली नाही. त्यांच्या या कृतीचा मला अभिमान असल्याचेही रितेशने ट्विटमध्ये म्हटले आहे.