अभिनेत्री ममता कुलकर्णीने काढला केनियातून दुबईला पळ
अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी फरार अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं केनियातून दुबईला पळ काढल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांनी दिली आहे.
मुंबई : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी फरार अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं केनियातून दुबईला पळ काढल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांनी दिली आहे. ममता कुलकर्णीचा प्रियकर विक्की गोस्वामी याला अमेरीकेतून भारतात आणण्याकरता भारतीय तपास यंत्रणांनी पावलं उचललीत. त्यानंतर ममता कुलकर्णीनं केनियातून दुबईला पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
जवळपास दोन हजार कोटींच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी, ममता कुलकर्णी, विक्की गोस्वामी विरोधात ठाणे न्यायालयानं अटक वॉरंट बजावलंय.
तसंच या दोघांनाही फरार घोषित केलंय. विकी गोस्वामीला काही महिन्यांपूर्वी केनियातून अमेरीकन पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर केंद्रीय गृह खात्याच्या माध्यमातून केनियात लपलेल्या ममताला बेड्या ठोकण्याकरता ठाणे पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरु केलेत.