`प्रत्येक श्वास...`; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी आदित्य ठाकरेंनी दिलं वचन
राज्यातील सत्तातरांनतर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे
Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेनेत फूट पडून दोन गट पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांनी बुधवारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यानंतर आज त्यांना सर्व पक्षीय राजकीय नेते आदरांजली वाहत आहेत. बाळासाहेबांचे नातू आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत बाळासाहेब ठाकरेंना एक वचन दिलं आहे.
"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!," असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्रात ढोंगी लोक जनतेची दिशाभूल करत आहेत - संजय राऊत
नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. "आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनाच प्राधान्य देऊन पुढे जात आहोत. कुणी काहीही सांगितलं तरी बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. शिवसेनाप्रमुखांना जाऊन 10 वर्षं झाली. त्यानंतर शिवसेना तोडण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झालाय. ज्या पद्धतीने बाळासाहेब आमचे, त्यांचे विचार आमचे असं ते म्हणत आहेत, हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. ढोंगाला लाथ मारली पाहिजे असं ते म्हणायचे. दुर्दैवाने आज महाराष्ट्रात काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत," असे संजय राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मृतीदिनाआधीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. मात्र एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावरून निघून जाताच ठाकरे गटातील नेत्यांनी स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडले आहे.