महाराष्ट्रातील वातावरण भयमुक्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
विरोधकांच्या टीकेला मला उत्तर द्यावेसे वाटत नाही.
मुंबई: नाईट लाईफच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाईट लाईफमुळे रोजगार आणि महसुलात मोठी वाढ होईल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. रोजगारांचे प्रमाणही घटले आहे. मात्र, महाराष्ट्रात आता भयमुक्त वातावरण आहे. त्यामुळे उद्योग वाढीला चालना मिळणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. तसेच विरोधकांच्या टीकेला मला उत्तर द्यावेसे वाटत नाही. मन दुषित असेल तर दृष्टीकोनही तसाच असतो. महाराष्ट्रातील जनतेचे मन स्वच्छ आहे. दुकाने रात्री उघडी राहिल्याने फायदा होईल. रोजगाराची संधी निर्माण होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असल्याचेही यावेळी आदित्य यांनी म्हटले.
'नाईट लाईफमुळे मुंबईत मद्यसंस्कृती फोफावेल; महिलांवर अत्याचार होतील'
दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाईट लाईफच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाईटलाईफ सुरू होत आहे. येत्या २६ जानेवारीपासून या निर्णयाची मुंबईत अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली होती.
मात्र, सुरक्षा आणि अन्य प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्याशिवाय २६ तारखेपासून अंमलबजावणी अशक्य असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली होती. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं दिसून आले होते. मात्र, आता आदित्य ठाकरेंशी चर्चा झाल्यावर देशमुख यांनी भूमिका बदलत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळात या निर्णयावर मोहोर उमटण्याची शक्यता आहे.