Maharashtra Assembly : एकाही पळालेल्या आमदारांने डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत केली नाही, सर्व डोळे चोरून खालती बघत होते किंवा दुसरीकडे बघत होते, अशी टीका शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा विशेष अधिवेशानात आज विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. यावेळी शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. शिवसेनेकडून व्हिप बजावण्यात आलं होतं. पण बंडखोर आमदारांनी व्हिप झुगारत नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं. 


यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. आज आमच्याशी डोळे चोरले आहेत, मतदार संघात गेल्यावर मतदार जे असतील, शिवसैनिक जे असतील त्यांना काय सांगणार हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.


शिवसेना म्हणून आम्ही काम करत राहू, काही जणांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा होत्या, हॉटेल, चार्टर्ड प्लेन वापरत होते, त्याचा खर्च कुठून झाला माहित नाही, नैतिकतेच्या चाचणीत बंडखोर आमदार नापास झाले अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.


जर भाजपनं अडीच वर्षांपूर्वी आमचं ऐकलं असतं तर आज ही वेळच आली नसती, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. 


आमदारांना इतकी सुरक्षा का?
त्याआधी विधानसभा अधिवेशन सुरु होण्याआधीही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला होता. अतिरेकी कसाबलाही इतक्या बंदोबस्तात आणलं गेलं नव्हतं, इतक्या मोठा बंदोबस्तात आमदारांना आणलं गेलं. विधानभवन परिसरात एवढा कडेकोट बंदोबस्त आहे. हा बंदोबस्त नेमका कशासाठी आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.