मुंबई : Aditya Thackeray to visit Ayodhya : शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, अयोध्येत शिवसैनिक, युवासैनिकांसह आदित्य ठाकरे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. अयोध्येमध्ये नकली भावनेतून जाणाऱ्या रामलल्लाचा आशीर्वाद मिळत नाही, त्यांना विरोध होणार, असे राऊत म्हणाले.  प्रभू श्रीराम देशातील सर्वांचे आहेत. अयोध्येत किंवा उत्तर प्रदेशात असली नकली बॅनर कुणी लावले माहिती नाही. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आमची तारीख 10 जून ठरतेय, असे  संजय राऊत म्हणाले. 


आदित्य ठाकरे  यांच्यासोबत खासदारही असणार आहेत. अयोध्येत आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे कार्यकर्तेही अयोध्येला जाणार आहेत, असे संजय राऊत म्हणालेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यानंतर 5 दिवसांनी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे.  त्यामुळे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. आदित्य टाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असल्याची माहिती  संजय राऊत यांनी दिली आहे.



दरम्यान, आदित्य ठाकरे आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावांच्या दौऱ्यावर आहे. सध्या ते शहापूर तालुक्यात दाखल झाले असून माळ गावाची पाहणी करत आहेत. शहापूर, मोखाडा आणि कसाऱ्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. यामुळे या दौऱ्यादरम्यान ते पाणी योजनांच्या कामांची पाहणी करतील. तसेच सावर्डे गावात उभारण्यात आलेल्या पुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. यावेळी ते 'झी 24 तास'शी बोलताना म्हणाले, मी अयोध्येला जाणार आहे.