मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरु आहे.   १४ मार्च १९९५...हाच तो दिवस त्या दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्रात युतीचं सरकार सत्तेवर आलं. महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांचं स्वप्न साकार झालं. शिवाजी पार्कवर भव्य दिव्य, ऐतिहासिक, अभूतपूर्व असा हा सोहळा पार पडला. भगवे ध्वज. युतीच्या जयजयकाराच्या घोषणा, ढोल, ताशे, लेझीम, तुतारीचा नाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हा शपथविधी पार पडला. मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर याच व्यासपीठावर युतीचा भव्य विजयी मेळावा पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवतीर्थावर उद्या संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या मुहूर्तावर हा शपथविधी पार पडेल. शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच हे व्यासपीठ तयार केले जात आहे. याच जागेवर दरवर्षी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावाही होत असतो. त्यासाठी सहा हजार फुटांचे भव्य व्यासपीठ उभारले जाईल. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. तसेच कार्यकर्त्यांना बसण्यासाठी तब्बल ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात २० एलईडी लावले जाणार आहेत. 


आता जवळपास २४ वर्षांनी त्याच शिवतीर्थावर शिवसेनेचा तिसरा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरेंचा हा शपथविधी सोहळा भव्य दिव्य व्हावा, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पुन्हा २४ वर्षांनी याच शिवाजी पार्कवर पुन्हा असाच भव्यदिव्य सोहळा रंगणार आहे. शिवाजीपार्क सज्ज झाला आहे.



शपथविधीची तयारी


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. त्य़ामुळे शिवसेनेकडून शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांना यासाठी आमंत्रण पाठवण्यात येणार आहे. ज्यामध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. शिवाज पार्क येथे हा शपथविधी सोहळा होणार असून जवळपास ७० हजार खुर्च्या येथे लावण्यात येत आहेत. तसेच एका मोठ्या मंचावर जवळपास १०० जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. 


खास सेट उभारणी 


उद्धव यांचा शपथविधी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर खास सेट उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये हा सेट उभारणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, नितीन देसाई यांची ख्याती पाहता ते ही कामगिरी सहज पार पाडतील, असा विश्वास शिवसेनेला आहे.