मुंबई : कोरोनाबाबतचे नियम काटेकोटपणे पाळले नाहीत तर पुन्हा निर्बंध लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत नियमांचं पालन न करणाऱ्यांवर अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे आदेश दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत असंही त्यांनी नमूद केलं.  गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितंल.


कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, 'मी सगळ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना, खासदार, आमदारांना सांगितले आहे की रुग्ण वाढ गंभीर आहे. अनेक देशात रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन करायला लागले, आपलीही वाढ गंभीर आहे. हे सगळं काळजी वाढवणारे आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागेल, लोकांनी आता निर्णयाची मानसिकता ठेवावी, कारण कोरोना वाढ गंभीर आहे.' 


राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूर, अमरावती, नाशिक आणि पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. त्यामुळे काही भागात पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.