अयोध्यावारीनंतर उद्धव ठाकरे वाराणसी दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांचा वाराणसी दौरा होणार आहे.
मुंबई : अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात हजारो शिवसैनिकांना सोबत घेऊन अयोध्या दौरा केला. हा दौरा शिवसैनिकांमध्ये चैतन्य आणणारा ठरला. तसेच राम मंदिर प्रश्नावर शांत असलेल्या भाजपा सरकारला या दौऱ्याने घरचा आहेर दिला. अयोध्यावारी नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांचा वाराणसी दौरा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख लवकरच दौऱ्याची अधिकृत घोषणा करतील अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 27 जुलै वाढदिवशी उद्धव ठाकरेंनी वाराणसी गंगा पूजन आणि अयोध्यावारी करण्याची घोषणा केली होती.
मोदींचा मतदारसंघ
राज्यात भाजपा सोबत सत्तेत सहभागी असलेली शिवसेना राम मंदिर, महागाई, जीएसटी, नोटबंदी अशा अनेक मुद्द्यावर सरकारला धारेवर धरत असते. आगामी निवडणूकीत भाजपाशी युती न करण्याचे संकेत शिवसेनेतर्फे देण्यात येत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मात्र युती होणारच असा विश्वास व्यक्त केला होता.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून मोदी सरकार आणि त्यांच्या धोरणांवर नियमित आगपाखड होत असते. अशातच उद्धव ठाकरे दौऱ्यावर जात असलेला वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. त्यामुळे राम मंदिर निर्माणाची गर्जना वाराणसीतही होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
अनेक धार्मिक आणि आध्यत्मिक संघटनांनी ठाकरेंना वाराणसी भेटीचे आमंत्रण दिले आहे. पंढरपूर दौऱ्यानंतर ठाकरेंच्या वाराणसी दौऱ्याचा कार्यक्रम ठरणार आहे. शरयू नदीच्या तीरावरील महाआरतीनंतर आता उद्धव ठाकरे करणार गंगा पूजन करणार असल्याचे म्हटले जात आहे. यशस्वी अयोध्यावारी नंतर शिवसेनेचे राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.