COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : माहुल आणि आसपासचा परिसर काल रात्री पुन्हा मोठ्या आवाजानं अनेकदा हादरला. यानंतर  स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलंय. बीपीसीएल कंपनीने पुन्हा वायूप्रवाह सुरु केल्याचा स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी आरोप केलाय. बुधवारी बीपीसीएलच्या प्लान्टमध्ये अग्नितांडव झालं होतं. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेत. २४ तासांहून अधिक वेळ धुमसत आग धुमसत होती. 


आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काल रात्री बीपीसीएल कंपनीने गुपचूप पुन्हा वायू प्रवाह सुरु केल्याचा आमदार तुकाराम काते यांचा दावा आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सिक्युरिटी गार्डनं लोकांना दमदाटी केली तसंच कंपनीनं गुपचूपपणे बॉयलर आणि गॅसप्रवाह सुरू केल्यानं नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे, असा आरोप काते यांनी केलाय. यावरून काते यांनी काल रात्री कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केलं.