मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलिआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयूचा शुभारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी यावेळी उपस्थित होते. 


राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.


राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टेलिआयसीयू सुविधा सध्या सहा जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. राज्यात अन्यत्रदेखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून ते याबाबत सकारात्मक आहेत. ही सेवा राज्यभर सुरु झाल्यास दुर्गम भागातील रुग्णांनादेखील विशेषज्ज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री  टोपे यांनी सांगितले.


आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात विशेषज्ज्ञांची जाणवणारी कमतरता टेलिआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल, असे आरोग्यमंत्री टोपे असे ते म्हणाले.