दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अजित पवार पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारल्यानंतर अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले आहेत. 


सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला. नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले.


शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पार्थ पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले आहेत.


पार्थ पवार पुन्हा चर्चेत


मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पार्थ पवार जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ सक्रीय नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असतानाही पार्थ पवार यांनी सुशांतसिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला विरोध करत असतानाच पार्थ पवार यांनी भाजपच्या मागणीलाच एक प्रकारे समर्थन करत, महाविकासआघाडीला अडचणीत आणलं. 


पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा देणारं ट्विटही केलं. जय श्रीराम म्हणत पार्थ पवार यांनी राम मंदिरासाठी शुभेच्छा देणारं पत्रही  लिहिलं. राम मंदिर भूमिपूजनामुळे कोरोना जाणार नाही, असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेलाही पार्थ पवार यांनी छेद दिला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला पार्थ पवार यांची ही वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगत सारवासारव करावी लागली.