मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की अजित पवार आहेत, हेच कळत नसल्याची खोचक टिप्पणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे शांत असतात. सगळ्या घोषणा या अजित पवार यांच्याकडूनच केल्या जातात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार आहेत, असा प्रश्न पडतो. मात्र, एक दिवस उद्धव ठाकरेच अजित पवार यांना कंटाळतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील, यशवंतराव गडाखांचा इशारा


यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारला लक्ष्य केले. ठाकरे सरकारने कोणताही अभ्यास न करता कर्जमाफी केली आहे. अवघ्या पाच ते सहा हजार रुपयांची मदत ही कर्जमाफी नव्हे. अनेक शेतकऱ्यांना याचा फायदाच झाला नाही. उद्धव ठाकरे यांना एकर आणि हेक्टरमधला फरकही समजत नाही. त्यामुळे द्धव ठाकरे जोपर्यंत नीट अभ्यास करून शेतकऱ्यांना दिलासा देत नाहीत तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.


नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१९पर्यंत दोन लाखांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. मार्च २०२०पासून ही योजना लागू होईल. यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले होते.