राज ठाकरे ! अजितदादा दिलखुलास हसतात, राष्ट्रवादी युवती काँग्रसचे प्रत्त्युतर
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून फोटोतून उत्तर देण्यात आलेय.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून फोटोतून उत्तर देण्यात आलेय.
राज यांनी त्यांच्या फेसबूक पेज लाँचवेळी अजित पवार यांची फिरकी घेतली होती. अजित पवार कधीही पाहावे तेव्हा ते गंभीर असतात. त्यांच्या चेहरा कधीही हसरा दिसत नाही, अशी टीका केली होती.
प्रसारमाध्यमांतील अनेक लोकांना मी गंभीर वाटतो. मी कधी हसतच नाही, असा त्यांचा समज आहे. मात्र, हा समज पूर्णपणे खोटा आहे. हसू न यायला मी काही अजित पवार नाही, असे राज यांनी म्हटले होते. त्यानंतर एकच हास्यकोळ झाला. ही टीका युवती काँग्रेसच्या जिव्हारी लागली.
राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकर्त्या अदिती नलावडे यांनी राज यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने राज ठाकरे यांना अजितदादा यांच्या हसऱ्या फोटोंचा एक अल्बम पाठवून दिलाय. हे पाहा ते कसे दिलखुलास हसतात, असे म्हटलेय. याअल्बमबरोबर राज यांना एक पत्रही पाठवले आहे. अनेक प्रसंगात अजितदादा मनमुराद हसतात, असे अदिती यांनी पत्रात म्हटलेय.
अजित दादा सत्तेत असतानाही आणि आता विरोधी पक्षात असताना आजही लोकांना भेटत आहेत. लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. हेच लोकांना अपेक्षित असते, असे प्रत्युत्तरही या पत्रातून देण्यात आलेय.