अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह घेतली फडणवीसांची भेट, 9 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?
सागर बंगल्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची द फडणवीसांसोबत तब्बल दीड तास खलबतं झाली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वा. पत्रकार परिषद होणार आहे
Maharashtra Political Crisis : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 8 आमदारांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता उरलेला सर्व मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) हा 9 जुलै रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) सागर बंगल्यावर अजित पवारांची बैठक झाली. त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, तटकरेही उपस्थित होते. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीवर कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याचं समजतंय. आता अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर रवाना झाले. अजित पवारांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर विधीमंडळ गटनेते पदावर जयंत पाटील (Jayant Patil) ऐवजी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर दुसरकडे प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आलंय. राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेता आणि प्रतोद याबद्दल तांत्रिक बाजू मांडण्यासाठी अजित पवार यांची आज दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद आहे...
अजित पवारांकडून संपर्क
अजित पवारांकडून आज काही आमदारांना संपर्क केला जातोय. काल राजभवनात शपथ घेताना एनसीपीचे दोन तृतीअंश आमदारांनी स्वाक्षरी केली असा दावा अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी केलीय. आता अजित पवारांसोबत आणखी तीन ते चार आमदार येतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. एकीकडे अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना संपर्क केला जातोय.. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या कार्यालयातही महत्त्वाची बैठक सुरु आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित आहेत.. पक्षातल्या फुटीनंतर पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचं कायदेशीर कामकाज पाहणारे शिवाजीराव गर्जेही राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झालेत.. मात्र सुप्रिया सुळेंनी अद्याप त्यांना भेट दिलेली नाही.. एका केबिनमध्ये त्यांना बसवून ठेवण्यात आलंय.. शिवाजीराव गर्जे काल दिवसभर अजित पवारांसोबत होते..
राष्ट्रवादी काँग्रेसने आता न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतली जाणार आहेत. 5 जुलैच्या बैठकीसाठी येताना प्रतिज्ञापत्र सोबत आणण्याचे आदेश देण्यात आलेत. शिवसेना ठाकरे गटानेही अशाच प्रकारे प्रतिज्ञापत्र भरून घेतली होती. तिकडे गेलेल्या आमदारांसाठी अजूनही पक्षाचे दरवाजे खुले आहेत.आम्ही एका मर्यादेपर्यंतच थांबू, त्यानंतर मात्र कारवाई करू असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर शरद पवारांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय, असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय.
अपात्रेबाबत याचिका
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल शपथ घेतलेल्या 9 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलीय. ही याचिका प्राप्त झाली असून दाखल करून घेतलीय असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हीच आहोत असा दावा अजित पवारांसह गेलेले राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. केंद्रात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय लवकरच घेऊ असंही ते म्हणाले.
आनंद परांजपे यांची हकालपट्टी
माजी खासदार आनंद परांजपे यांची ठाणे शहर अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे... आनंद परांजपे यांनी काल अजित पवारांना पाठिंबा दिला होता. तसंच देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेटही घेतली होती.. त्यामुळे राष्ट्रवादीकडून ही कारवाई करण्यात आलीय. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन नवीन शहराध्यक्षाची निवड केल्याची माहिती दिलीय. त्यानुसार ही जबाबदारी माजी नगरसेवक सुहास देसाईंवर सोपवण्यात आलीय..