शरद पवारांकडची बैठक संपली, अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली आहे. अजित पवार दुखावलेले गेले नाहीत, तंसच पार्थ पवारांबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत, त्यांच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, असं वक्तव्य शरद पवार आजच केलं यांनी केलं होतं. यानंतर संध्याकाळी पवारांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
शरद पवार यांच्यासोबतची बैठक कालच ठरली होती. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पवारांनी बोलवलं होतं. अजित पवार दुखावलेले नाहीत. तसंच पार्थ पवारांबाबत चर्चा झाली नसल्याचं बैठक संपल्यानंतर जयंत पाटील म्हणाले.
पार्थ पवार यांनी काही मतं मांडली असतील, तर मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण ते काय बोलले हे मी वाचलेलं नाही. पार्थ पवारांकडून स्पष्टीकरण मागवणार नाही. पवार कुटुंबियांमध्ये तसंच पक्षात अजिबात वाद नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
अजित पवार बैठक सोडून निघून गेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ते निघाले, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. सुशांतसिंग राजपूतप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरही शरद पवारांनी आज भाष्य केलं. महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे, पण सीबीआय चौकशीला माझा विरोध नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती.