`आदिपुरुष असेल, परपुरुष असेल किंवा...`; अजित पवारांना `आदिपुरुष` वादाबद्दल वेगळीच शंका
Ajit Pawar On Adipurush Controversy: `आदिपुरुष` चित्रपटासंदर्भात मागील 3 दिवसांपासून वेगवेगळे वाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर थेट अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी खास आपल्या शैलीमध्ये या प्रकरणावर भाष्य करताना एक शंका उपस्थित केली.
Ajit Pawar On Adipurush Controversy: शुक्रवारी देशाबरोबरच जगभरात प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रामायणावर आधारित या चित्रपटामध्ये मूळ कथेचे तोडमोड करण्यात आल्यापासून ते पात्र ज्यापद्धतीने चित्रपटात दाखवली आहेत यावरुन मोठा वाद (Adipurush Controversy) निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षापासून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या चित्रपटावर टीका केली आहे. मात्र प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटासंदर्भातील वादावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया नोंदवताना वेगळीच शंका व्यक्त केली आहे.
"आदिपुरुष असेल परपुरुष असेल..."
मुंबईमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांना 'आदिपुरुष' चित्रपटासंदर्भात वाद सुरु असल्याचा उल्लेख करत पत्रकारांनी प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीमध्ये, "अरे बाबा, असे चित्रपट निघाल्यानंतर मग तो चित्रपट आदिपुरुष असेल परपुरुष असेल किंवा आणखीन कसला पुरुष असेल तरी या असल्या वादाची कशाला चर्चा करता?" असा प्रतिप्रश्न पत्रकारांनाच केला. अजित पवार यांनी पुढे बोलताना शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या वेळी झालेला वाद आणि दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटाच्या वेळेसही असाच वाद झाल्याची आठवण पत्रकारांना करुन दिली.
अजित पवारांनी व्यक्त केली ही शंका
अजित पवार यांनी 'पठाण' आणि 'पद्मावती'चा उल्लेख करत असे वाद निर्माण करण्यासंदर्भातील वेगळीच शंका बोलून दाखवली. "हे असं 'पठाण'च्या वेळेलाही झालं होतं. त्याआधी 'पद्मावत' की 'पद्मावती' त्याबद्दलही झालं होतं. मला असा वाटतं की हे चित्रपट मोठ्या प्रमाणात, देशपातळीवर चालण्या करता हे केलं जातं. अशावेळेस त्रयस्त काय विचार करतो की असे एवढी मोठी बातमी आली. असं काय आहे या चित्रपटामध्ये असा विचार करुन चित्रपट पहायला जातोय. हेच त्यामागील गमक आहे की काय याचाही शोध घेतला पाहिजे," असं अजित पवार 'आदिपुरुष'संदर्भातील वादावर भाष्य करताना म्हणाले.
बंद पाडलेले शो ते संवादांची भाषा
दरम्यान, मुंबईमधील नालासोपाऱ्यामध्ये रविवारी रात्री 'आदिपुरुष' चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला. या चित्रपटामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा चित्रपटाला विरोध करणाऱ्यांकडून केला जात आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटामध्ये ज्या भाषेतील संवाद वापरण्यात आले आहेत ती अगदीच 'छपरी','टपोरी' भाषा असल्याची टीका होत आहे. या टीकेची दखल घेत चित्रपटाचे संवाद लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकांनी या चित्रपटातील संवाद बदलणार असल्याची घोषणा केली आहे.
वादानंतरही घसघशीत कमाई
एकीकडे या चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच दुसरीकडे हा चित्रपट तिकीटबारीवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 140 कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हा आकडा 200 कोटींच्या वर गेला. तर रविवारी केवळ भारतात या चित्रपटाने 64 कोटींच्या व्यवसाय केल्याची माहिती समोर आली आहे.