मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्याधिकारी चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण, आता चंदा कोचर यांच्या कुटुंबीयांनी बांधकाम क्षेत्रासंबंधी केलेल्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय आयसीआयसीआयच्या प्रशासनाने घेतला आहे. चंदा कोचर बँकेच्या सीईओ असतानाच्या काळातील सर्व व्यवहार तपासले जाणार आहेत. या बातमीनंतर आयसीआयसीआय बँकेच्या समभागांची किंमतही घसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेच्या संचालक मंडळाने काही दिवसांपूर्वी चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वाखाली याप्रकरणाचा तपास सुरु आहे. संचालक मंडळाने न्या. बीएन श्रीकृष्ण यांना कोचर यांच्यावरील सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. 


त्यानुसार आता न्या. बीएन श्रीकृष्ण चंदा कोचर सीईओ असतानाच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांनी खरेदी केलेल्या मालमत्तेच्या व्यवहारांची चौकशी करतील. कोचर यांच्या कार्यकाळात त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे का? तसेच विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांना कर्ज आणि बँकिंग सुविधांच्याबाबतीत विशेष सूट देण्यात आली का, हेदेखील तपासून पाहिले जाणार आहे.