फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर `महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब` म्हणतात...
फडणवीस मुख्यमंत्रीपदावर असताना अमृता फडणवीस या अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत राहिल्या
मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस आता माजी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आता माजी उपमुख्यमंत्री झालेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर बहुमताच्या अभावी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवण्याची नामुष्की ओढावलीय. देवेंद्र फडणवीसांचं दुसरं सरकार अवघ्या ७८ तासात कोसळलं. बहुमत नसल्यानं अवघ्या साडेतीन दिवसांत देवेंद्र फडणवीसांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर शायरीद्वारे व्यक्त केल्यात. 'पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे!' असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.
शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीनं मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेतली. यावेळी राजभवनात त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा उपस्थित होत्या. फडणवीस मुख्यमंत्रीपदावर असताना अमृता फडणवीस या अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत राहिल्या. 'तुमची वहिनी म्हणून पाच वर्ष प्रेम दिल्याबद्दल महाराष्ट्राचे धन्यवाद... तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या सदैव लक्षात राहील. सकारात्मक बदल घडवण्यासाठी क्षमतेप्रमाणे मी माझ्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला' असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
देवेंद्र फडणवीसांचा २०१४चा शपथविधी जेवढा अपेक्षित आणि अतिभव्य होता. तेवढाच २३ नोव्हेंबर २०१९चा देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी धक्कादायक होता. महाराष्ट्र झोपेतून जागा होत असतानाच कुणालाही काही कळायच्या आत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली मुदत कमी करून सुप्रीम कोर्टानं ती २७ नोव्हेंबरपर्यंत आणली. दुसरीकडं ज्यांच्या साथीनं नव्या सरकारची शपथ घेतली त्या अजित पवारांचं अवसान गळाल्यासारखं झालं. त्यांच्या पाठिमागं आवश्यक ते आमदारांचं पाठबळ नसल्यानं त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या माघारीमुळे सरकारकडं कागदावरचंही बहुमत उरलं नाही. त्यामुळं बहुमताच्या अग्निपरीक्षेआधीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दोन राजकीय़ विक्रमांची नोंद झाली. पहिला विक्रम होता वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी राहण्याचा... आणि दुसरा विक्रम म्हणजे सर्वात कमी साडे तीन दिवस मुख्यमंत्रिपदी राहण्याचा... राजकीय डावपेच उलटे पडले की काय होतं हे गेल्या एक महिन्यात पूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलंय.