मुंबई : कांदिवली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाच्या उदघाटनावरून शिवसेना भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यांच्यात प्रचंड वादावादी सुरू होती. मात्र, 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणेनंतर येथील वातावरण अगदीच पालटून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेने येथे सरदार वल्ल्भभाई पटेल ऑलम्पिक जलतरण तलाव बांधला आहे. या विभागात भाजपचे आमदार योगेश सागर असून येथल्या भाजप नगरसेवकांचीही संख्या जास्त आहे. या तलावाचे काम पूर्ण होऊनही त्याचे उदघाटन न झाल्याने भाजपने रविवारी या तलावाचे उदघाटन करण्याचा निर्णय घेतला, तसे बॅनर्सही विभागात लावले.


तर, महापालिकेच्या माध्यमातून शिवजयंतीच्या दिवशी तलावाचे उदघाटन करण्याचे ठरवले. मुंबईच्या महापौर यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा होणार होता. या कार्यक्रमाला भाजपने विरोध केला होता. त्यानुसार आज या तलावाच्या उदघाटनप्रसंगी सेने भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.


शिवसेना नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी वारंवार आवाहन करूनही ना शिवसैनिक ऐकत होते ना भाजप कार्यकर्ते.. महापौर किशोरी पेडणेकर यांनी माईक आपल्या हातात घेतला.


 



कुणाचाही आवाज नको. फक्त, मनपाचाच आवाज असणार आहे. मी आणि आमदार योगेश सागर हे एकाच बॅचचे आहोत. आज शिवजयंती आहे, असे सांगून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 


मात्र, कार्यकर्ते शांत होत नव्हते. अखेर आमदार योगेश सागर यांनी माईक आपल्या हातात घेत 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली आणि अचानक वातावरणात शांतता निर्माण झाली.