व्यवस्था दाद देत नसेल तर `धर्मवीर` होते पर्यायी व्यवस्था, नागरिकांना झटपट न्याय देणारा नेता
टेंभी नाक्यावर असलेल्या आनंद आश्रमात लोकांना न्याय मिळत होता.
मुंबई : टेंभी नाक्यावर असलेला आनंद दरबार हा लोकांना न्याय देणारा आश्रम बनला होता. लोकं मदतीसाठी थेट आनंद दिघे (Aanand Dighe) यांच्याकडे येत होते. ठाण्यावर त्यांची हुकूमत सुरु झाली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होण्याआधीच त्यांची ठाणे जिल्ह्यावर मोठी छाप पडली होती. आनंद दिघे यांना जेव्हा एका प्रकरणात अटक झाली तेव्हा सलग ३ दिवस ठाणे बंद होतं. पण त्यांच्याच आवाहननानंतर ठाणे पुन्हा सुरु झालं.
20 ते 25 वर्षाच्या राजकीय आयुष्यात लाभलेली लोकप्रियता मोजक्या लोकांनाच लाभते. लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि धारदार नजरेने अधिकाऱ्यांकडे पाहिल्यानंतर त्या सुटायच्या. आनंद दिघे यांनी हजारो लोकांच्या समस्या सोडवल्या. ज्यामुळे त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा लोकांमध्ये वाढू लागला होता.
आनंद दिघे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवसेना आणि ठाणेकरांना वाहून दिलं. दिघे यांनी कधीही कोणतं मंत्रीपद स्वीकारलं नाही. आनंद दिघे यांनी शेवटपर्यंत फक्त लोकांची सेवा केली.
आनंद दिघे जावून जवळपास २ दशकं गेली. पण आनंद दिघे यांची जागा कोणीही घेऊ शकले नाही. आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना मोठी केली. ठाण्याचा ढाण्या वाघ असं दिघे यांना म्हटलं जातं.
शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे पण ठाण्यात शिवसेना म्हणजे आनंद दिघे असं समीकरण होतं. आनंद दिघे यांचा प्रवास झंझावात होता. सर्वसामान्यांसाठी झटण्याचा वेग असामान्य होता. आनंद दिघे यांच्यामुळेच शिवसेना सर्वसामान्यांची वाटू लागली.
दिघे यांच्या जनता दरबारात होणारे न्यायनिवाडे आजही ठाणेकरांच्या आठवणीत आहेत. कार्यकर्त्यांचा देखील ते तेवढाच विचार करायचे. शिवसैनिकांची काळजी घ्यायचे.
बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे, व्यवसाय उभा करण्यासाठी मराठी तरुणांना पाठबळ देणारे नेते म्हणजे आनंद दिघे होते. या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. आश्वासन देणाऱ्यांपेक्षा काम करणारे शिवसैनिक त्यांनी घडवला.
सामान्य व्यक्तीचं अडलेलं कोणतंही काम असो. व्यवस्था जर त्यांना दाद देत नसेल तर धर्मवीर त्यांना पर्यायी व्यवस्था होती. शब्दाने न ऐकणाऱ्या व्यक्तींना आनंद दिघे स्टाईल माहित होती.