आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे का मानले आभार?
राज्यात कोरोनाचा उद्रेक (covid-19) वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक (covid-19) वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण पडू शकतो. लोक कोविड (covid-19) नियमांचे गांभीर्याने पालन करत नाही. त्यामुळे परिस्थिती कठिणी होऊन बसली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा ( Lockdown) पर्याय पुढे येत होता. याला विरोधी पक्ष भाजपसह अन्य काही राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला. तर उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही विरोध दर्शवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेला संबोधित करताना विरोधकांसह नाव न घेता उद्योगपती आनंद महिंद्रा यांना चांगलेच सुनावले. मी लॉकडाऊन लावत नाही, तुम्ही वाढणाऱ्या कोरोना रुग्णवाढीवर उपास सांगणार का, असा थेट सवाल केला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्याआधी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीरपणे लॉकडाऊनचा इशारा दिला होता. पण लॉकडाऊनला महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांचा तसेच काही उद्योजकांनी विरोध दर्शवला होता. विरोध दर्शवणाऱ्यांमध्ये महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. यावेळी आनंद महिंद्रा यांचा उल्लेख न करता टोला लगावला होता. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाऊन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे. लॉकडाऊन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय. सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहते. आता या करोनासंबंधित नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे, जेणेकरुन ही बंधने लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील. दरम्यान, त्याआधी आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करुन लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केला होता. उद्धवजी, समस्या ही आहे की, लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरित मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होते.
उद्धव ठाकरे पाहा काय म्हणाले होते...
मी त्यांचे नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितले की, लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितले, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करुन रोज मला किमान 50 डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांचा महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण केवळ फर्निचरचे दुकान म्हणजे हॉस्पिटल नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.