COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातला पादचारी पूल कोसळल्यानं आज सकाळीच लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे... या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतोय. तर रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम होताना दिसतोय. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याच पहायला मिळतंय. त्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. बेस्ट प्रशासनान जादा बसेस सोडल्या आहेत. कोसळलेल्या पुलाचा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे. महापालिकेचं अग्निशमन दल, एनडीआरएफ मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. बघ्यांना घटनास्थळी गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात येतंय... पुलाचा भाग कोसळल्याने ओव्हर हेड वायर तुटल्या आहेत. या ढिगाऱ्याखाली एक जण अडकला होता, त्याची सुटका करण्यात यश आलंय. 


पाच जण जखमी


या दुर्घटनेत पाच जण जखमी झालेत. जखमींना जवळच्याच कुपर रुग्णालयात हलवण्यात आलंय.  यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे... तर तीन जणांना फ्रॅक्चर झालंय. एकूण चार पुरुष आणि एक महिला यात जखमी झाले आहेत... द्वारकाप्रसाद शर्मा, मनोज मेहता, हरिश कोहाटे, गिंधम सिंघ अशी जखमी झालेल्या पुरुषांची नावं आहेत... तर एक महिला जखमी आहे. ढिगारा उपसण्यासाठी आणखीन काही तास लागण्याची शक्यता आहे.रुळावरील ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 


मदतकार्य युद्धपातळीवर सुरू 


तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचं समजतंय. घटनास्थळी एनडीआरएफ, आरपीएफ, फायरब्रिगेड, डिझास्टर कंट्रोलची टीम घटनास्थळी दाखल झालीय. एनडीआरएफची टीम डॉग स्कॉडसहीत पोहचलीय... ढिगाऱ्याखाली आणखीन नागरिक अडकले आहेत का? याची चाचपणी यंत्रणा करत आहे.


मोठा अनर्थ टळला...


ही घटना घडली तेव्हा या मार्गावरून पुढे जाणाऱ्या रेल्वेच्या मोटरमनला ब्रिज कोसळण्याची शक्यता दिसली... त्यामुळे मोटरमननं प्रसंगावधान राखत एमर्जन्सी ब्रेक मारून लोकल थांबवली... त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 


हार्बर रेल्वेवरही परिणाम 


पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प झालीय. लोकलसेवा ठप्प झाल्यानं रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसतेय. घाटकोपर - वर्सोवा रस्ते वाहतूक प्रभावित झालीय. हार्बर रेल्वेसेवेवरही याचा परिणाम...  हार्बर रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वे मार्गावर प्रवासाची मुभा देण्यात आलीय. 


बेस्ट आली धावून...


मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा 'बेस्ट' प्रशासन धावून आलंय. बोरीवली ते चर्चगेट या मार्गावर १४ अधिक बसेस चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिलीय.  


अडकले असाल तर... अंधेरीतून बाहेर कसे पडाल?


- अंधेरी पश्चिमेतून एसव्ही रोडने विलेपार्ले गाठता येईल


- अंधेरी पूर्वेतून पश्चिम द्रूतगती महामार्गानं विलेपार्ले गाठता येईल


- अंधेरी पश्चिमेतून एसव्ही रोडने जोगेश्वरीकडे जाता येईल


- अंधेरी पूर्वेतून जोगेश्वरीला जाण्यासाठी पश्चिम द्रूतगती मार्गानं जाता येईल


- अंधेरीहून मेट्रोनं घाटकोपरला येऊन दक्षिण मुंबईकडे येता येईल


डबेवाल्यांच्या सेवेवरही परिणाम


या घटनेमुळे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गवरची डबेवाल्यांच्या सेवेवरही परिणाम झालाय. ही घटना समजताच डबेवाल्यांना डबे न घेण्याच्या किंवा घेतलेले डबे घरी परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या... आज पश्चिम मार्गावरची रेल्वे सेवा बंद राहील, अशी माहिती डबेवाला असोसिएशनचे प्रतिनिधी सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिलीय. 


बघ्यांची गर्दी


फायरब्रिगेड, डिझास्टर कंट्रोलची, रेल्वे प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झालीय. अद्याप या घटनेत कुणीही जखमी झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. मात्र, घटनास्थळी बघ्यांची गर्दी झालीय... त्यांचाही अडथळा मदतकार्याला होतोय. 


फायरब्रिगेट आणि मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेत. संपूर्ण परिसर पोलिसांनी रिकामा केलाय. हा ढिगारा उचलण्यासाठी क्रेनची गरज भासतेय... परंतु, पावसामुळे मात्र क्रेन अद्याप घटनास्थळी पोहचू शकलेली नाही. त्यामुळे मदतकार्याला उशीर होतोय. 


रस्त्यावर वाहतूक कोंडी... चाकरमानी गोंधळले 


सध्या कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. ऑफिससाठी बाहेर निघालेले चाकरमानी मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर ताटकळलेत. या घटनेमुळे रस्ते मार्गावरही वाहतूक कोंडी दिसू लागलीय. पोलीस पर्याय मार्गाचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत. 


या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आवाहन आहे. या ठिकाणी गर्दी करू नका. तुमच्याकडे इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पर्यायी मार्ग असेल तरच घराबाहेर पडा... 


हेल्पलाईन क्रमांक


अंधेरी - ०२२ ६७६३००५४


चर्चगेट - ०२२ ६७६२२५४०


बोरीवली - ०२२६७६३४०५३


मुंबई सेंट्रल - ०२२ ६७६४४२५७