मुंबई : लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या छगन भुजबळ यांची एन्जिओग्राफी करण्यात आली आहे. पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या विविध तपासण्या सध्या सुरू असून त्या पूर्ण झाल्यानंतर पोटावरील शस्त्रक्रियेबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत.


समीर भुजबळांना जामीन नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनी लॉंड्रिंग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भुजबळांना जामीन मिळता मिळत नाही. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात समीर भूजबळांच्या जामीन अर्जावर सूनावणी झाली. यावेळी PMLA कायद्यातील बदलाच्या धर्तीवर जामीनाची मागणी समीरच्या वकिलांनी केली.  या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळांना जामीन मिळाल्याचा दाखला देत समीरला देखील जामीन देण्याची मागणी करण्यात आली.


देशभरात पिएमएलए कायद्यांतर्गत अटक असलेल्या ५४ पैकी ५३ आरोपींना जामीन मिळाल्याचा दाखला कोर्टात देण्यात आला.  गुरूवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.


भुजबळांशी शिवसेनेची चर्चा?


दरम्यान, शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छगन भुजबळ यांची भेट घेतलीय. नार्वेकर आणि भुजबळ यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत नाशिकमधले पक्षाचे पदाधिकारी दत्ता गायकवाडही होते. भुजबळ- नार्वेकर भेटीला सोमवारी नाशिकमध्ये होणा-या विधानपरिषद निवडणुकीची पार्श्वभूमीही असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे अशी ही लढत होतेय... नाशिकच्या राजकारणात भुजबळ यांचं अजूनही प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनेला सहकार्याची अपेक्षा आहे.