आताची मोठी बातमी! अफजलखानची कबर हटवल्यानंतर सरकारचा अजून एक मोठा निर्णय, त्या जागेवर आता...
अतिक्रमण काढलेल्या जागेवर आता... पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती
सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान कबर जवळील अतिक्रमण हटवल्यानंतर सरकारने आता अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा असणारा छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. शिवभक्तांच्या मागणी लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट आणि साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे! असं लोढा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कबरीजवळील अतिक्रम हटवलं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं अफजलखानच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं. जिल्हा प्रशासन आणइ पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिवप्रतापदिनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलं होतं. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन कबरीचं उदात्तीकरण केलं जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. यावरून हिंदुत्वावादी संघटनांनी आवाज उठवला होता.
हा वाद न्यायालयात गेला. काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायलयाने कबरीभोवती झालेलं अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानेही बांधकाम अनधिकृत ठरवत तोडण्याच्या सूचना दिली होती.