मुंबईत कोरोनाचा आणखी एक रुग्ण
मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८वर
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८वर पोहचली आहे. अमेरिकेतून प्रवास करुन आलेला कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाच्या संपर्कात आल्यामुळे ही लागण झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबईत आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आता महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ४३वर पोहचली आहे. आज पुणे आणि मुंबईत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती फ्रान्स आणि नेदरलँडवरून प्रवास करून आली होती. तर मुंबईत पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीला अमेरिकेतून आलेल्या नातेवाईकाच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.
राज्यातल्या संशयितांची तपासणी वेगानं व्हावी यासाठी आठ ठिकाणी नवीन टेस्टिंग सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. तर तीन ठिकाणी नवीन लॅब सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुंबईतील केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयात तर पुण्यात बीजे मेडिकलमध्ये लॅब सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढला आहे. कोरोनाची लागण झालेले, कोरोनाची लक्षणं आढळलेल्या रुग्णांनी इथ तपासणीसाठी यावं अशी सूचना आहे. मात्र तरीही अगदी सर्दी खोकला झालेले नागरिकही इथे तपासणीसाठी गर्दी करत असल्याचं चित्र आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुंबईत कमीत कमी गर्दी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पण मुंबईकरांनी मात्र हे फारसं मनावर घेतलेलं दिसत नाहीये. कारण मुंबईतल्या गर्दीवर फार फरक पडलेला दिसत नाही. मुंबईतल्या लोकलमध्ये गर्दी कायम होती. दुसरीकडे रस्त्यावरही वाहनांची संख्या मोठी दिसत होती. बीकेसीसारख्या ठिकाणीही अनेक ऑफिसेस सुरु असल्याचं दिसलं. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोनाला फारसं गांभीर्याने घेतलं नाही का असा प्रश्न पडू लागलाय.