प्रशांत परदेशी, धुळे : हॅलो फ्रेंड, मी अफगाणिस्तानच्या लष्कारात भरती झाले आहे. मला मोठा खजिना मिळाला आहे. त्याची किंमत ४.३ मिलियन आहे. मी तुम्हाला पाठवते, असे सांगून नोटांचे बंडल पॅक करण्याचा व्हिडिओ व कुरिअरची पावती ई-मेलने पाठवून धुळ्यातील एका शिक्षकांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. अमिषाला बळी पडून या शिक्षकाने लाखोंची रक्कम गमावली आहे. फसवणुकीची ही मुळं बिहार, दिल्ली, मुंबई पर्यंत पसरली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे शहरात राहणारे शिक्षक संजय शेणपडू देसले यांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. इलिस मिचेल नामक तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर इलिसाने देसले यांच्याशी संपर्क साधला. ही तरुणी देसले यांना अमेरिकन सैन्यात असून अफगाणिस्थानात तैनात असताना ४.३ मिलियनचा खजिना हाती लागल्याचे पटवून देण्यात यशस्वी झाली. आपल्या हिस्स्याला ३० टक्के खजिना आला असून तो मी तुम्हाला पाठवत आहे, असे इलिसाने देसले यांना एका व्हिडिओ द्वारे सांगितले. 


या व्हिडिओत नोटांचे बंडल आणि ब्रिटीश कुरियर सेवेची एक पावती दाखवली. ती पावती ई-मेल द्वारे देसले यांना पाठवली. मग देसले यांना मुंबईहुन फोन आला. मी कस्टम अधिकारी गरिमा देशमुख बोलत असून तुमचे अफगाणिस्थानातून एक पार्सल आले आहे असे सांगण्यात आले. हे पार्सल सोडविण्यासाठी पैसा भरावे लागतील असे सांगून ३ लाख २७ हजार रुपये देसले यांना पाठवण्यास लावले. पुन्हा पैशांची मागणी झाल्यानंतर देसले यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली तर गरिमा नावाची कोणतीच अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले.


आमिषला बळी पडल्याने देसले यांना तब्बल ३ लाख २७ हजारांचा गंडा घातला गेला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत बिहार, दिल्ली आणि मुंबई येथे या प्रकारांचे धागेदोरे आढळे आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर सायबर पोलिसांकडून तपासाला सुरूवात झाली आहे. त्यातून इलिस मिचेलच्या नावाने बनावट बँक खाते असल्याचे समोर आले आहे. शिवाय गरिमा देशमुख नावाची एकही महिला कस्टम विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी ट्रेस केलेला नंबर मुंबईतील नालासोपारा येथील आहे.


एकीकडे सायबर क्राईमध्ये वाढ होत असताना शिक्षक असलेले देसले या प्रकाराला बळी पडले कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. मोठ्या आमिषापोटी देसले यांनी घरातील दागिने मोडून आणि रोकड कथित गरिमा देशमुखने सांगितलेल्या बँक खात्यात जमा केली. आता सायबर सेल गुन्हेगारांच्या अटकेसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रकारामुळे आता तरी दक्ष व्हा असे म्हणायची वेळ आली आहे.