आरोपींना पुराव्यांच्या प्रती देणं शक्य नाही, अँटिलिया प्रकरणात NIA ची कोर्टात माहिती
देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोडवरील अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरण सध्या कोर्टात आहे.
मुंबई : देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोडवरील अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरण सध्या कोर्टात आहे. या प्रकरणाचा तपास NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. ज्यावेळी कोर्टात केस असते. तेव्हा तपास यंत्रणेला आरोपपत्राची प्रत आणि पुराव्यांच्या प्रति तसेच इतर साऱ्या कागदपत्रांच्या प्रति या आरोपींच्या वकिलांना द्याव्या लागतात. मात्र या केसमध्ये सर्व पुराव्यांच्या प्रतीसाठी मोठया प्रमाणात होणारा खर्च आणि लागणाऱ्या वेळेमुळे आरोपींना देणे शक्य नसल्याची माहिती एनआयएने मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे.
आरोपींना प्रती देण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांचा खर्च !
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुरावे आरोपींना उपलब्ध करण्यासाठी तब्बल ४० लाख रुपयांचा खर्च येणार असून हा खर्च परवडणारा नसल्याचे एनआयएतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले आहे.
याशिवाय या प्रती आरोपींना उपलब्ध करण्यासाठी २५८ दिवस म्हणजेच आठ महिने किंवा त्याहून अधिकचा वेळ लागेल असेही एनआयएने न्यायालयात स्पष्ट केले. पुराव्यांमध्ये मोठया प्रमाणात डिजिटल पुराव्याचा समावेश असून त्यात मुंबई आणि ठाणे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलेले चित्रिकरणही आहे. दूरध्वनी नोंदी आणि त्यांच्या संभाषणाच्या लाखो प्रतींचाही समावेश असल्याचा दावा एनआयएने केला आहे.
या प्रकरणात १० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर अशा बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) कलमे लावण्यात आली आहेत.