मुंबई : नागपाड्यात स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याबद्दल समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अटक करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केली आहे. तसेच अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली केल्याबद्दल त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ मे रोजी रात्री समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी नागपाडा पोलीस स्टेशनबाहेर स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केले आणि लॉकडाऊन दरम्यान लागू असलेला अपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्याने त्यांचे ऐकले नाही म्हणून संबंधित महिला अधिकाऱ्याला वाईट शब्दांत शिवीगाळ केली, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोमैया यांनी ट्वीट केला असून अबू आझमी यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.



महिला पोलिसांना शिवीगाळ करणे, अपमान करणे त्याबरोबरच भारतीय दंडविधान कलम १८८ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सोमैया यांनी केली आहे. आझमी यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलीस उपायुक्त, तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही सोमैया यांनी तक्रार केली आहे.



या प्रकरणात अबु आझमी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकारने पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांचीच बदली नागपाड्यातून चेंबुरला केल्याने सोमैया यांनी टीका केली आहे. याबाबत सोमैया म्हणाले, सार्वजनिक जनहितार्थ बदली केली आहे असे शर्मा यांच्या बदलीच्या आदेशात म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या दृष्टीने जनहित म्हणजे पोलिसांचे मनोबल खाली आणणे असा अर्थ आहे? की जे राजकीय नेता महिला पोलिसांचा बाप काढतात, अपमान करतात, अशा समाजवादी पक्षाच्या नेत्याला वाचवणे म्हणजे जनहितार्थ? असा सवाल सोमैया यांनी केला आहे.



वेगवेगळे मुद्द्यांवर ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या किरीट सोमैया यांनी आता अबु आझमींचा मुद्दा लावून धरला आहे.