उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या पुसद न्यायालयानं वॉरंट बजावलेत. मराठा क्रांती मोर्चासंदर्भात सामना दैनिकात प्रकाशित केलेल्या एका व्यंगचित्रा प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आलेत. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि प्रसिद्धक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्धही वॉरंट जारी करण्यात आलंय.
मराठा आरक्षणाच्या मागणी घेऊन झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावलंय.
या व्यंगचित्रावरून दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत आणि इतर आरोपी कोर्टासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टानं त्यांच्याविरुद्ध समन्सही धाडले. त्यानंतर आता न्यायालयानं आरोपींविरुद्ध १५ हजार रुपयांचं बेलेबल वॉरंट जारी केलंय.