पेस्टीसाईडमुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम?
पीक चांगलं यावं म्हणून शेतामध्ये पेस्टीसाईडचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.
मुंबई : पीक चांगलं यावं म्हणून शेतामध्ये पेस्टीसाईडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. चुकून पेस्टीसाईड नाका-तोंडात गेलं तर जीवावरही बेतू शकतं. मात्र याच पेस्टीसाईडबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेस्टीसाईड घरात ठेवल्यानं शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. इतकच नाही तर पेस्टीसाईड जवळ ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यचा विचार वाढत असल्याचं समोर आलंय. (as per research pesticide effected on farmer body and health know what say excpert)
एका संशोधनातून ही धक्कादायक बाब समोर आलीय. वर्ध्याच्या दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमधील डॉक्टरांनी हे संशोधन केलंय. केवळ आत्महत्याच नव्हे तर घरात पेस्टीसाईड ठेवल्यामुळे मानसिक तणाव, झोपेच्या समस्यांही उद्भवतात.
संशोधनातून काय समोर आलं?
घरात पेस्टीसाईड असलेल्या 26 टक्के लोकांमध्ये डोक्यात आत्महत्येचे विचार येतात. तर घरात पेस्टीसाईड न ठेवणाऱ्या 8 टक्के लोकांमध्ये आत्महत्येचा विचार येतो. ज्यांनी घरात पेस्टीसाईड ठेवलंय अशा 55 टक्के लोकांना डोकेदुखीचा त्रास होते.
तर पेस्टीसाईट न ठेवणाऱ्या लोकांचं प्रमाण 35 टक्के इतकं आहे. 60 टक्के लोक असे आहेत ज्यांनी घरात पेस्टीसाईड ठेवल्यानं त्यांना झोपेत त्रास होते. तर घरात पेस्टीसाईड न ठेवणाऱ्या लोकांचं प्रमाण 19 टक्के इतकं आहे. पेस्टीसाईडमुळे 44 टक्के लोकांमध्ये तणाव दुसून आला तर पेस्टीसाईड घरात न ठेवताही तणावग्रस्त जीवन जगणा-या लोकांचं प्रमाण 24 टक्के इतकं आहे.
यावर उपाय म्हणून घराऐवजी गावातल्या ग्रामपंचायतीत किंवा गावातल्या एकाच ठिकाणी कुठेतरी हे पेस्टीसाईड्स ठेवायला हवीत असं संशोधकांनी सूचवलंय.
या संशोधनामुळे शेतकऱ्यांची झोप उडालीय. मात्र या संशोधकांकडे दुर्लक्षूनही चालणार नाही. बळीराजाला खऱ्या अर्थानं जगवायचं असेल तर या नव्या संकटावर तातडीनं उपाययोजना व्हायलाच हवी.