मुंबई : आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो, पण दहापैंकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही, असा निष्कर्ष 'अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' अर्थात 'असर'च्या अहवालातून समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या २४ राज्यांतील २४ जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला. सर्वेक्षणासाठी सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी ३५ संस्थांच्या मदतीने १ हजार ६४१ गावांतील २५ हजार घरांना भेटी दिल्या... आणि ३० हजार मुला-मुलींशी संपर्क साधून त्यांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. 


ही मुले काय करतात, त्यांची क्षमता, जागरूकता, त्यांचे ध्येय अशा चार मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण करण्यात आलं. हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा कसा बोजवारा उडालेला आहे, हे त्यातील निष्कर्षांनी दाखवून दिलंय.


वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी न झालेल्या मुलांची संख्या ५ टक्के आहे, तर १८ वर्षांच्या मुलांचे याबाबतीत प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 


'शिक्षण हक्क कायदा २००९' हा अंमलात आल्यानंतर लगेचच जी मुले आठवी इयत्ता उत्तीर्ण झाली, अशा १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक स्थितीबाबत हा अहवाल भाष्य करतो.


६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असे शिक्षण हक्क कायद्यामध्ये म्हटले आहे.