राज्यातील आशा वर्कर्सना खूशखबर मिळण्याची शक्यता
राज्यातल्या आशा वर्कर्सना उद्या खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातल्या आशा वर्कर्सना उद्या खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आशा वर्कर्सचं मानधन वाढवण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. आशा वर्कर्सचं मानधन महिन्याला २ हजार रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यामध्ये आशा वर्कर्सना १,५०० ते २,००० रुपये मानधन दिलं जातं. त्यात आणखी २ हजार रुपये वाढवून देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येऊ शकतो. आशा वर्कर्सना मानधन वाढवून देण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. या मागणीसाठी आशा वर्कर्सनी बंदची हाकही दिली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनीही आशा वर्कर्सचं मानधन वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर आशा स्वयंसेविकांच्या मानधनात लवकरच २ हजार रुपयांनी वाढ करणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं होतं. ३ जुलैला आशा वर्कर्स संपावर जाणार आहेत, असं समजलं पण महाविकासआघाडी सरकार त्यांना संपावर जाऊन द्यायची वेळ येऊन देणार नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती.