दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचा दावा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र दर काही दिवसांनी अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येणे, ही आता नित्याची बाब झाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला निर्णयप्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यातील भेटीनंतर ही नाराजी दूर झाल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी इथेच बसलोय, सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

अशोक चव्हाण यांच्या खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव त्यांच्याशी चर्चा न करताच तयार करण्यात आला. मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याने अशोक चव्हाण नाराज झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही नाराजी बोलून दाखवल्याचे समजते. त्यामुळे आता हे नाराजीनाट्य किती लांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

यापूर्वीही अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यानंतरही परिस्थिती न सुधारल्यामुळे अशोक चव्हाण यांची नाराजी वाढल्याचे समजते. गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्त्या आदी मुद्द्यांवरून महाविकासआघाडीतील पक्ष आमनेसामने आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून महाविकासआघाडी सरकारच्या स्थैर्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सातत्याने पुढाकार घेऊन आतापर्यंत या वादांवर पडदा टाकण्याचे काम केले आहे. परंतु, सातत्याने नाराजीचे सूर उमटत राहिल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकासआघाडीचा कारभार कसा चालवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.