`अजित पवारांनी राजीनामा देऊन परत यावं`
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या `रेनिसन्स हॉटेल`मध्ये ठेवण्यात आलं आहे.
मुंबई : अजित पवार यांनी राजीनामा देऊन परत यावं असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. चूक सुधारून अजित पवारांनी राष्ट्रवादीत परतावं, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फसवलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची दिशाभूल केली असं म्हणणं चूकीचं ठरणार नाही. असं मत व्यक्त करून अशोक चव्हाण यांनी अजित पवार यांना पक्षात परत येण्याचा सल्ला दिला. आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकाराणाला नाट्यमय स्वरूप प्राप्त झाले.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी सर्वांनी मिळून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ३० नोव्हेंबरची वाट न पाहता स्वत:हून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि अजित पवार यांनी देखील झालेली चूक विसरून परत यावं असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.
आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ पाहायला मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले.
पण त्यांचा हा प्रयत्न फेल ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांना पाठवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आता, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या 'रेनिसन्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे. शिवाय शिवसेनेचे आमदार देखील मुंबईतच आहेत, काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला ठेवण्यात आल्याचं समजत आहे. आता हे राजकारण काय नवीन वळणं घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.