मुंबई : होणार होणार होणार म्हणता म्हणता अखेर घोडं गंगेत न्हालं... नारायण राणे भाजपावासी झाले... आणि राणेंचा 'स्वाभिमान' भाजपामध्ये विलीन झाला. नारायण राणेंनी आपल्या आयुष्यात शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आणि आता भाजपा असे महत्त्वाचे टप्पे गाठलेत. इतकंच नाही तर बेधडक, फायरब्रँड आणि करारी म्हणून ओळखला जाणारा हा नेता आता 'भाजपाच्या शिस्तीत रमणार' असं म्हणताना दिसतोय. राणेंना तंगवत तंगवत अखेर त्यांना भाजपात घेताना मुख्यमंत्र्यांनीही राणेंची थोडी शाळाच घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खऱं तर हा हाडाचा शिवसैनिक आणि फायरब्रँड नेता... पण उद्धव ठाकरेंशी झालेल्या मतभेदावरुन २००५ मध्ये राणेंनी १० आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राणेंनी काँग्रेसची टोपी डोक्यावर घातली खरी... पण त्या टोपीत राणे कधी रमलेच नाहीत. काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि थेट हायकमांडवरच राणे निशाणे साधत राहिले. दिल्लीनं राणेंची काँग्रेसमध्ये कधीच डाळ शिजू दिली नाही.


मधल्या काळात निलेश राणेंचा दोन वेळा लोकसभा निवडणुकीतला पराभव, आणि खुद्द राणेंचा विधानसभा निवडणुकीतला आणि पोटनिवडणुकीतला पराभव जिव्हारी लागल्यावर राणेंनी २०१७ मध्ये 'स्वाभिमाना'चा वेगळाच झेंडा उभारला. तोपर्यंत सगेसोयरेही राणेंना सोडून गेले. 

भाजपाशी खुल्लमखुल्ला प्रेम करायला अडसर होता तो शिवसेनेचा... म्हणूनच अखेर तंगवत तंगवत का होईना, राणेंचा भाजपा प्रवेश एकदाचा पार पडला. एकेकाळी 'स्वाभिमान' या नावावर अंगार उठवणारा हा नेता... आता 'एक होता स्वाभिमान' म्हणत भाजपावासी झालाय.